पिंपरी : नैराश्येपोटी आत्महत्येच्या विचाराने निगडीतील उड्डाणपुलावर आलेल्या २२ वर्षाच्या तरुणाला नागरिकांनी सतर्कता दाखवुन पोलिसांच्या मदतीने आत्महत्या करण्यापासुन त्यास रोखले. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.
निगडी येथील उड्डानपुलावर पहाटे ट्रक पलटी होण्याच्या अपघाताच्या घटनेमुळे वाहतुक पोलीस त्या ठिकाणी हजर होते. निगडी उड्डाणपुलावर झालेली वाहतुक कोंडी सोडविण्याचा वाहतुक पोलीस प्रयत्न करीत होते. दरम्यानच्या काळात त्याच पुलावर आत्महत्येच्या उद्देशाने एक तरुण दाखल झाला होता. गळ्याला साडी बांधुन पुलावर गळफास घेण्याचे त्याने ठरविले होते. गळ्याला साडी बांधुन ती पुलाला बांधण्याचा प्रयत्न सुरू असताना, ही बाब नागरिकांनी पाहिली. प्रसंगाधवधान दाखवत नागरिकांनी तेथील वाहतुक पोलिसांना माहिती दिली. वाहतुक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी शिंदे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तरूणाकडे धाव घेतली. घरगुती कारणास्तव नैराश्य आल्याने आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला असे त्याने पोलिसांना तसेच तेथील नागरिकांना सांगितले. पोलिसांनी त्याची समजुत काढली. त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. समज देऊन त्यास सोडून देण्यात आले.