पिंपरी : धूलिवंदन (dhulivandan) हा रंगांची उधळण करण्याचा दिवस. मात्र टवाळखोर याचा गैरफायदा घेऊन काही जणांना जबरदस्तीने रंग लावतात. त्यामुळे वादाचे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी भरारी पथके स्थापन केली आहेत. त्यामुळे रंगाच्या सणाचा बेरंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच राहणार असून, टवाळखोरांवर रडारवर आहेत.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सण, उत्सव सामूहिकपणे साजरे करण्यावर निर्बंध होते. त्यामुळे दोन वर्ष धूलिवंदनला रंगांची उधळण करता आली नाही. यंदा १७ मार्चला होळी तर १८ मार्चला धूलिवंदन असून निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे यंदा धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. यात तरुणाई आघाडीवर आहे. मात्र, रंगाचा सण म्हणून ओळख असलेल्या या धूलिवंदनच्या आनंदाचा काही टवाळखोर बेरंग करतात. बस, रेल्वे, खासगी वाहने किंवा दुचाकीवरून जाणाऱ्यांना तसेच महिलांना ‘टार्गेट’ करतात. फुगे किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकून मारतात. यात अपघात होण्याची शक्यता असते. यात रंग डोळ्यात, तोंडात जाऊन दुखापत होऊ शकते.
मद्यपी ट्रिपलसीट दुचाकीस्वारांचा धुमाकूळधूलिवंदन साजरी करण्याच्या नावाखाली काही टवाळखोर मद्यपान करून दुचाकी चालवतात. काही जण ट्रिपलसीट दुचाकी चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा दुचाकीस्वारांकडून गल्लीबोळांत कर्णकर्कश्य हाॅर्न वाजवून तसेच आरडाओरडा करून गोंधळ घातला जातो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वादविवाद होऊन दोन गटात हाणामारी देखील होते.
साध्या वेषातील पोलिसांची गस्तगल्लीबोळात गोंधळ घालणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईसाठी पोलिसांची भरारी पथके तसेच साध्या वेषातील पोलीस गस्त घालणार आहेत. मिश्रवस्ती, संवेदनशील ठिकाणे तसेच झोपडपट्टी भागात ही पथके तैनात राहणार आहेत. तसेच बाजारपेठ, भाजीमंडई, बसथांबे, मुख्य चौक, गर्दीच्या इतर ठिकाणी देखील पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे. रंग लावण्याची जबरदस्ती करीत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.