रावेत : वाल्हेकर वाडी येथे वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होता. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या भागात पोलीस चौकीची नितांत आवश्यकता होती. ही गरज ओळखून प्राधिकरणाच्या जागेवर नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पोलीस चौकीची उभारणी करण्यात येत आहे. तसेच या परिसरातील आवश्यक विकास कामे लवकरच सुरू करण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. वाल्हेकरवाडी येथील प्राधिकरणाच्या चिंतामणी चौकालगत पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटनेते एकनाथ पवार, चिंचवड वाहतुक विभागाचे निरीक्षक संजीव पाटील, विलास मडेगरी, नगरसेवक नामदेव ढाके, मोना कुलकर्णी, तुषार कामठे, बाळासाहेब ओव्हाळ, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, आरक्षण असणारे बांधकामे पाडण्यात येणार आहे. परंतु, जे आरक्षणबाधित नाही त्यांचे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करून ती नियमित कशी होतील यावर शासन स्तरावर विचार चालू आहे. अधिवेशनापूर्वी शास्ती कर रद्द करून अनाधिकृत घरे नियमित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर परिसरातील शाळा, स्मशानभूमी, उद्याने इ. ची आरक्षणे आहेत. ती कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिवले तर आभार सचिन चिंचवडे यांनी मानले.