पिंपरी : जनतेसाठीच पोलीस असून, नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर राहील. तसेच पोलिसांची जबाबदारी, कर्तव्य व अधिकार याबाबत त्यांना माहिती देणार आहे. त्यासाठी टाॅक टू काॅप्स हा उपक्रम राबवून नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
नागरिक पोलिसांकडे अनेक तक्रारी करतात. त्यात काही तक्रारींचे निराकरण करणे पोलिसांच्या अधिकारात येत नाही. तरीही सर्वसामान्यांकडून त्या समस्या मांडल्या जातात. पोलिसांची जबाबदारी आणि अधिकार याबाबत माहिती नसल्याने, असे होते. मात्र असे असले तरी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या आहेत, हे समजून घेऊन संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात येईल. महापालिका, महसूल विभाग, आरटीओ अशा संबंधित विभागाकडे तक्रारी मांडण्याबाबत नागरिकांना सहकार्य केले जाईल. टाॅक टू काॅप्स या उपक्रमातून पोलीस नागरिाकंपर्यंत पोहचणार आहेत. शहरातील पिंपळे साैदागर, सांगवी, चिंचवड, चाकण, देहूरोड, वाकड या सहा ठिकाणी या कार्यक्रमाचे टप्प्याटप्प्याने आयोजन केले जाईल. चिंचवड येथील कल्याण प्रतिष्ठान येथे बुधवारी (दि. ३०) सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे. महासेतू या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येत आहे.
टाॅक टू काॅप्स या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. पोलीस जनतेसाठीच आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्यासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न आहे. - कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड