किवळे : नव्याने निवड झालेल्या पोलीस पाटलांना तीन दिवसांचे कायद्याबाबत प्राथमिक माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून पोलीस पाटलांनी बंदूक परवाना घेऊन ठेवावा. ग्रामीण भागातही भाडेकरूंची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देणे आवश्यक आहे . नागरीकरण वाढत असल्याने देहूरोड, तळेगाव दाभाडे , तळेगाव एमआयडीसी , आळंदी , व चाकण या पाच पोलीस ठाण्याचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच याबाबत निर्णय अपेक्षित आहे , असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रावेत येथे व्यक्त केले.विश्वास नांगरे-पाटील सध्या पुणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यांची तपासणी करीत आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी रावेत येथे एका रिसॉर्टमध्ये बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षिका तेजस्वी सातपुते, देहूरोड उपविभागीय अधिकारी गणपत माडगूळकर, देहूरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण मोरे, कॅन्टोन्मेंट बोडार्चे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल , नगरसेवक रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू , गोपाळराव तंतरपाळे , फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे , सारिका आगळे, बालाजी गायकवाड, तळेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील, पौडचे निरीक्षक एस पी निंबाळकर , सहायक निरीक्षक विनोद घोळवे , उपनिरीक्षक एम ए लांडगे , मनोज पवार उपस्थित होते.नांगरे पाटील म्हणाले,‘‘ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलिसच आहे, ही भावना वाढीस लागायला हवी. मनुष्यबळ कमी असल्याने तारंबळ उडत असून मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मंगल कार्यालय भागात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी प्रामुख्याने बाजारपेठ भागात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याची गरज असून सुरक्षाव्यवस्थेत सी.सी.टी.व्ही. चा तिसरा डोळा म्हणून उत्तम उपयोग होत आहे, असे सांगून त्यांनी कॅन्टोन्मेंटने देहूरोड परिसरात सी.सी.टी.व्ही. लावण्याचे आवाहन केले.
पोलीस पाटलांना प्रशिक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:45 AM