पिंपरी - राजकीय मतभेद विसरून पिंपरी-चिंचवड शहरातील दिग्गज नेते रविवारी एकत्र आले. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ उपक्रमाचे. अडीच तास गप्पांची मैफील, फड रंगला. हास्यविनोद करताना एकमेकांची फिरकी घेण्याची संधी या वेळी कोणीच सोडली नाही.राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे, दिलखुलास संवाद घडावा. या हेतूने दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ या उपक्रमाचे आयोजन केले होते. आकुर्डी प्राधिकरणातील केरळ भवन येथे रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, संजय ऊर्फ बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, सिनेअभिनेते भरत जाधव, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, गटनेते राहुल कलाटे, मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक राजू मिसाळ, नाना काटे, शत्रुघ्न काटे, अमित गावडे, भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात, दिशाचे संस्थापक बाळासाहेब जवळकर आदी उपस्थित होते.अभिनेते भरत जाधव म्हणाले की, विविध विचारांच्या पक्षांचे लोकप्रतिनिधी अशाप्रकारे एकत्र येण्याचे दुर्मिळ चित्र आज अनुभवण्यास मिळाले. सामाजिक सलोखा जपण्याचे काम या निमित्ताने होत असते. असेच दिशादर्शक काम यापुढील काळात घडावे.’’भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘शहराला सांस्कृतिक परंपरा आहे. दिवाळी फराळ ही विचारांची मेजवानी सर्वांना ऊर्जा देणारी आहे. दिशाच्या व्यासपीठावर राजकीय जोडे बाजूला ठेवून, नेहमीच्या व्यस्त कामातून वेळ काढत दिलखुलास आणि निखळ गप्पांची मैफल जमून आली.’’अध्यक्ष गोरख भालेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. आभार कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी मानले.
मतभेद विसरून रंगला राजकीय फड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 1:31 AM