जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:03 AM2022-11-04T09:03:41+5:302022-11-04T09:03:53+5:30
भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी
पिंपरी : जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे आणि जातीयवादाचे विष पेरण्याचे काम देशात सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे सातवर्षात विघातक राजकारण सुरू आहे, देशाची घटना बदलण्याचे काम काही लोक करीत आहेत, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पिंपरीत गुरूवारी केली.
पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने भारत जोडो यात्रेबाबत प्रबोधन करण्यासाठी रथ तयार केले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात प्रबोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने खराळवाडीत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पाटील बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी केली आहे. धर्माच्या नावाने प्रश्न निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम भाजपा करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महागाई बेरोजगारीने कळस गाठला असताना मूळ प्रश्नांपासून भरकटविण्याचे काम केले जात आहे.
डाळ, तेलाचे, गॅसचे दर गगणाला भिडलेत. सामान्यांच्या डोक्यावर महागाई मारण्याचे काम केले आहे. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना जातीयवाद वाढविण्याचे काम केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण केले जात आहे, ही बाब हानीकारक आहे. बंधूभाव धोक्यात येत आहे. माणुसकीधर्म वाढविण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे.’’