पिंपरी : महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची मुदतपूर्व बदलीचे पडसाद शहरात उमटले आहेत. त्यावरून राजकीय आखाडा सुरू झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसने आयुक्ताची बदली करणाऱ्या भाजपचा निषेध केला असून काही घडलेच नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. ‘मुख्यमंत्र्यांचा निर्णय असून नियमित बदली असल्याचे भाजपने म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राजेश पाटील यांची दीड वर्षांपूर्वी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी नियुक्ती झाली होती. त्यांनी दीड वर्षांत प्रशासकीय शिस्त लावण्याबरोबर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या चुकीच्या कामांना ‘ब्रेक’ लावला होता. सत्ताधारी भाजपच्या कालखंडातील विविध गैरव्यवहारांची चौकशी लावली होती. आमदार खासदारांच्या महापालिकेतील हस्तक्षेपास लगाम घातला होता. त्यामुळे राज्यात सत्ता बदलताच आयुक्तांची बदली केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे तर आयुक्तांच्या बदलीत आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
बदली चुकीच्या पद्धतीने
आयुक्त राजेश पाटील यांची मुदतपूर्व बदली ही करण्याची कारणे वेगळी आहेत. त्यांनी दीड वर्षांत चांगली कामे केली. शहराची प्रतिमा उंचावण्याचे काम केले. अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपच्या काळातील आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुदत संपल्यानंतरही काम करण्याची संधी दिली होती. आयुक्त हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. जनतेचे असतात. बदली चुकीच्या पद्धतीने झाली आहे. - अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
तडकाफडकी बदली हा राजकीय उद्देश
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करणे यात राजकीय उद्देश दिसून येत आहे. त्यांनी दीड वर्षांत चुकीच्या कामांना ‘ब्रेक’ लावला. आयुक्त पाटील यांची बदली करणे ही बाब संशयास्पद आहे. चांगले काम करूनही बदली होणे ही चांगली बाब नाही. शहर विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलले होते. - सचिन भोसले (शहराध्यक्ष शिवसेना)
ही चांगली बाब नाही
दीड वर्षांच्या काळात आयुक्तांनी चांगले काम केले. मात्र, त्यांची मुदतपूर्व बदली होणे चांगली गोष्ट नाही. विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. प्रशासन काळात नागरिक आणि प्रशासन यांच्यात दुवा बनण्याचे काम त्यांनी केले. मुदतपूर्व बदली होणे चांगली बाब नाही. - सचिन चिखले, शहराध्यक्ष मनसे