पिंपरी : वाकड-ताथवडे या एकाच प्रभागातील कामावरून सत्ताधारी आणि विरोधात जुंपली आहे. "वाकड परिसरातील विकास कामाविषयी आयुक्तांनी शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे तो अहवाल रद्द करावा, अशी तक्रार महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या संकटात महापालिकाची आर्थिक स्थिती चांगली असेल तर विकासकामे करण्यास हरकत नाही, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. वाकड परिसरातील रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधकात जुंपली आहे. स्थायी समितीने चारपैकी दोन विषय मंजूर करून दोन दप्तरी दाखल केले. यावरून शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भाजप विकासात राजकारण करीत असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्तावर निशाणा साधला आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे शहरातील ३२ प्रभागात विविध विकासकामे करण्यास मर्यादा आल्या आहेत. सर्वच प्रभागातील नगरसेवकांकडून विकासकामे करण्यासाठी मागणी आहे. उत्पन्न घटलेले असताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये काँक्रीटकरणाऐवजी डांबरीकरणाची फेरनिविदा काढावी, असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष लोंढे यांनी २७ ऑगस्टच्या सभेत दिला होता. तसेच, हा विषय मतदानाद्वारे फेटाळून लावण्यात आला. मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी नगरविकास कक्ष अधिकार्यांना पाठविलेल्या अहवालात कोणतेही कारण न देता तो विषय दप्तरी दाखल केल्याची खोटी माहिती सादर केली आहे.
तसेच पिंपळे गुरव येथील सूर्यनगरी व परिसरातील रस्ते काँक्रीटकरणासाठी ५ कोटी १२ लाख खर्चाचा विषय मतदानाद्वारे मंजुर करण्यात आला आहे. विषयपत्रिकेवर २२.९९ टक्के कमी दराची ही निविदा असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, निविदा व स्वीकारलेल्या निविदा एकाच स्वरूपाच्या असताना सुद्धा स्विकृती दरापेक्षा ७ टक्के दराने जास्त आहे. आयुक्तांनी शासनास खोटी व दिशाभूल करणारा अहवाल दिला आहे. त्यामुळे तो फेटाळण्यात यावा. स्थायी समितीने दिलेला निर्णय कायम करण्यात यावा.''