पिंपरी : प्रभाग क्रमांक दहा हा पुर्वीचा शाहुनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर, विद्यानगरचा भाग, त्यात म्हाडा कॉलनी, मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनीचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. शाहुनगर, संभाजीनगरमधून प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंगला कदम आणि शारदा बाबर या दोन्ही प्रस्थापित उमेदवार आहेत. मात्र नव्याने जोडलेल्या मोरवाडी भागातील मतदारांशी त्यांचा अधिकचा संपर्क नाही. अशी वस्तुस्थिती आहे,याच भागातील मतदारांचा कौल या लढतीसाठी निर्णायक ठरणार आहे. शाहुनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, एचडीएफसी कॉलनी हा पुर्वीचा प्रभाग क्रमांक १० मधील परिसर आहे. प्रभाग फेररचनेत संत ज्ञानेश्वरनगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदिरा नगर, हा भाग समाविष्ट झाला. प्रभागाची मतदारसंख्या ५४,०३६ इतकी आहे. त्यामध्ये सुमारे ९ हजार मतदार नव्याने जोडलेल्या भागातील आहेत. संभाजीनगर ते मोरवाडी अशी दोन टोके असलेला विस्तारित प्रभाग आहे. प्रभाग १० क मधुन माजी महापौर मंगला कदम राष्ट्रवादीकडून तसेच विद्यमान नगरसेविका शारदा बाबर शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांच्यात चुरशीची लढत होणार असून भाजपाच्या सुप्रिया चांदगुडे, काँग्रेसच्या नसिमा सय्यद, मनसेच्या विद्या कुलकर्णी यासुद्धा क गटातुन रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)
समाविष्ट भागातील मतदान निर्णायक
By admin | Published: February 13, 2017 1:58 AM