पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. कधीतरी अपवादात्मक परिस्थितीत नव्हे, तर हे विदारक वास्तव नित्याचेच झाले आहे. आयसीयूसाठी रुग्णाच्या खाटेचे बुकिंग करून वायसीएममध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये रुग्णांना दाखल करण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. खासगी रुग्णालयाचा खर्च पेलण्याची आर्थिक कुवत नसलेल्या गरीब रुग्णांना या परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहावे लागत आहे.
या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कधीही रुग्णास न्या, खाटा उपलब्ध नाहीत, असेच उत्तर तेथील डॉक्टरांकडून मिळते. खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करा, आपल्याकडे जागा उपलब्ध होताच रुग्णास आणता येईल, असे वायसीएमचे डॉक्टर सांगतात. मंगळवारी दुपारी एकास हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. रुग्णास वायसीएममध्ये नेले असता आयसीयूमध्ये जागा नाही, असे सांगण्यात आले. रुग्णाची प्रकृती बिकट असतानाही त्याच्यावर सर्वसाधारण वॉर्डातच उपचार करण्यात आले. रात्री त्यास आॅक्सिजनची गरज भासली, त्या वेळी थोडा वेळ त्यास अतिदक्षता विभागात नेऊन पुन्हा सर्वसाधारण वॉर्डात आणून ठेवले आहे. अद्याप त्याच्या कोणत्याही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या नाहीत, अहवाल प्राप्त झालेले नाहीत. वायसीएममध्ये एका आयसीयूमध्ये १५, तर दुसऱ्या ठिकाणी १८ खाटा आहेत. नव्याने २५ खाटांच्या आयसीयूचे काम हाती घेतलेआहे.मात्र ते पूर्ण झालेले नाही. आयसीयू उपलब्ध नाही म्हणून रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येऊ नये, याची महापालिका वैद्यकीय विभागाने दक्षता घेणे गरजेचे आहे. गरीब-गरजूंसाठीचे हे रुग्णालय त्यांच्यासाठी अत्यंत तातडीक वेळी उपयोगात आले नाही तर रुग्णालयाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
रुग्णांचे हाल : वायसीएममध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडामहापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने येथे पाण्याची सोय करावी, अशी मागणी नातेवाईक करीत आहेत. दररोज दहा लाख लिटर पाणीही अपुरे पडू लागले आहे. शहरातील महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सर्वांत मोठे सात मजली आहे. येथे शहर व जिल्हाभरातून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची वर्दळ असते. अत्यंत कमी दरात येथे रुग्णांवर उपचार केले जातात.
खासगी रुग्णालयाच्या तुलनेत माफक दरात सर्व चाचण्या होत असल्याने बाह्य रुग्ण विभागातही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, रुग्णालयात पाण्याची टंचाई असल्याने नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांसोबतच येथे शेकडो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाण्याचे नियोजन नसल्याने पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी रुग्णालयात प्रकल्प राबविण्यात आला आहे.