लोकमत न्यूज नेटवर्करावेत : शहराचे वाढते तापमान, शेती क्षेत्रातील घट, वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, नैसर्गिक ओढे-नाले यावरील वाढते अतिक्रमण आणि अस्वच्छता, नदी परिसरातील वाढलेले घाणीचे साम्राज्य, वृक्षारोपणाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे प्राधिकरण, मावळलगत असणारा डोंगर परिसर, रावेत, प्राधिकरणातील दुर्गा टेकडी परिसरामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये विशेषत: हिरवे पोपट आणि साळुंकी यामध्ये मागील वर्षापेक्षा या वर्षी निम्म्याने घट आढळून आली आहे. याबाबत राज्य शासन व स्थानिक महापालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक उपाययोजना, जंगली फळझाडांची लागवड न केल्यास शहर परिसरात दृष्टीस पडणारे हिरवे पोपट आणि साळुंकी काही वर्षांत नामशेष होतील, अशी भीती पक्षिप्रेमी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाने केलेल्या गेल्या वर्षी मार्च - एप्रिल -मे २०१६ मध्ये तसेच या वर्षी मार्च - एप्रिल - मे मध्ये शहर परिसरातील प्राधिकरण, दुर्गादेवी उद्यान टेकडी, रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी - गुरुद्वारा , देहूरोड टेकडी या विभागांमध्ये केलेल्या पक्षी निरीक्षणात ही बाब समोर आली. देशी फळझाडांची लागवड करावी ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असल्यास महापालिका प्रशासनाने शहरातील उद्यान परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात या देशी फळझाडांची लागवड करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातील सदस्य सुजित पानसे, संदीप सकपाळ, विजय मुनोत, अमृत महाजनी,प्रज्वल ख्याडगी, विद्या शिंदे, समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.
पोपट, साळुंकी पक्ष्यांमध्ये निम्म्याने घट
By admin | Published: May 15, 2017 6:37 AM