पिंपरी : आठ तासांच्या पूर्वनोटिशीने बंद केलेला बोपखेल रस्ता व रक्षक सोसायटीकडून विशालनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समवेत भाजपाच्या लोकप्रतिनिधींची सकारात्मक चर्चा आज झाली. संरक्षणमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना रस्त्याविषयी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील दोन्ही रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे, अशी माहिती खासदार अमर साबळे यांनी दिली.बोपखेल व रक्षक सोसायटीनजीकच्या रस्त्यासंदर्भात दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्या वेळी पुण्यातील खासदारांनी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी संरक्षणमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पर्रीकर यांनी पुणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज येथे बैठक बोलावून लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी खासदार अमर साबळे व अनिल शिरोळे यांच्यासह सी. एम. ई. व रक्षकचे सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पुणे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त राजीव जाधव, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, संजय काटे, शत्रुघ्न काटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सौरभ राव व पिंपरी-चिंचवड आयुक्त राजीव जाधव यांनी बोपखेल रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. या रस्त्यासाठी अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी यांनी ६ एप्रिलच्या आत ना-हरकत द्यावे, असे आदेश पर्रीकर यांनी दिला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका सदर रस्ता करण्याच्या निविदा काढून रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त राजीव जाधव यांनी दिले.(प्रतिनिधी)संरक्षण मंत्र्यांनी दोन्ही रस्त्यांच्या प्रश्नाची माहिती घेतली. पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीच्या सीमाभिंतीस लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्त्याचे काम बंद पाडले होते. या रस्त्याबाबत महापालिकेकडून अंडरटेकिंग घेऊन १२ मीटरचा रस्ता करण्यास लष्करी अधिकाऱ्यांनी त्वरित ना हरकत देण्याचे आदेश संरक्षणमंत्र्यांनी दिले. त्यामुळे दोन्ही रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.- अमर साबळे, खासदार.पिंपरी-चिंचवड हद्दीतील दोन्ही प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. या विषयी संरक्षण मंत्र्यांनी लष्करास सूचना केल्या आहेत. त्यामुळे कार्यवाही पूर्ण झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार आहे.- राजीव जाधव, आयुक्त
बोपखेल प्रश्नावर सकारात्मक चर्चा
By admin | Published: April 01, 2016 3:23 AM