लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरणाकरिता गेल्या अनेक वर्षांपासून बनकरवस्ती येथील रस्त्याच्या पश्चिमेस असलेली टेकडी पोखरली असून, यामुळे या टेकडीवरून जाणाऱ्या संजय गांधीनगरच्या रस्त्याची सीमाभिंत खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या टेकडीवर उभारलेल्या सिमेंट चौथऱ्याखालची माती खचली असून, ही भिंत थेट २० ते २५ फूट खाली असलेल्या महामार्गावर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे संजय गांधीनगरच्या रहिवाशांचा मोशी गावठाणाकडे येण्याचा रस्ता बंद होणार असून, त्यांना बोऱ्हाडेवाडी रस्त्यावरून वळसा घालून गावठाणाकडे यावे लागणार आहे. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होणार असून, नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार आहे.येथील बहुसंख्य विद्यार्थी मोशीतील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ते दररोज शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. याबरोबरच नागरिकही कामानिमित्त दररोज मोशीत जाऊन-येऊन करीत असतात. रस्त्यावर रात्रीच्या वेळी रहदारीही मोठ्या संख्येने असते. रस्त्याच्या वरील बाजूस सावता माळी मंदिर असून, येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यामुळे या रस्त्यावरून भाविकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. हा रस्ता बंद झाल्यास गैरसोईचा सामना करावा लागणार आहे. भराव खचल्याने त्यावरील डांबरी रस्ताही कधीही खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रस्त्याच्या खालच्या व दक्षिणेकडे काही घरे आहेत. ही भिंत खचून डोंगराचा भराव वाहून आल्यास महामार्गासह या घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा विचार करून प्रशासनाने या भिंतीलगत समतल भिंत उभारून रस्त्याला कायमचा मजबूत आधार उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. या भिंतीखाली काही घरे असून, ही भिंत कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते. माळीणची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ही भिंत खचू नये याकरिता त्या भिंतीच्या पूर्वेला महामार्गाच्या बाजूने वीस ते पंचवीस फूट उंच सिमेंट भिंत उभारावी. यामुळे रस्ता खचण्याची भीतीही नाहीशी होईल व त्या खालच्या घरांवरील धोकाही टळेल, असे येथील रहिवाशांचे मत आहे. यावर तातडीने दखल घेतली जावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.संजय गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीचा महमार्गाच्या बाजूने भराव खचला असून, ती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, आजार झाल्याशिवाय उपचार न करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे कान कोण उपटणार? असा प्रश्न आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची, कोणता विभाग याला जबाबदार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या कोणालाही दुरुस्तीचे स्वप्न पडले नाही. अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी जनरेटा लावण्याची गरज आहे.याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांतून विचारला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक होणारा पूल खचल्यास अनेक जणांचे प्राण जाण्याची शक्यता आहे. परंतु, आजार झाल्याशिवाय उपचार न करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे कान कोण उपटणार? असा प्रश्न आहे. ही जबाबदारी नेमकी कोणाची, कोणता विभाग याला जबाबदार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या कोणालाही दुरुस्तीचे स्वप्न पडले नाही. अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करण्यासाठी जनरेटा लावण्याची गरज आहे.
सीमाभिंत खचण्याची शक्यता
By admin | Published: June 20, 2017 7:20 AM