पिंपरी : देशभरातील सर्वच क्षेत्रांतील कामगारांचा मोदी सरकारने व केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी अपेक्षाभंग केला आहे. तसेच कामगारांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता पोस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या फसव्या सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक पुणे विभागाचे सचिव राजू कर्पे यांनी केला आहे. संपामुळे टपाल सेवा ठप्प झाली आहे.
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटना तसेच नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक या राष्ट्रीय संघटनांच्या नेतृत्वाखाली टपाल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्याअंतर्गत चिंचवड गाव, चिंचवड स्टेशन, पिंपरी कॉलनी, पिंपरी, थेरगाव, वाकड, हिंजवडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, औंध, सांगवी, प्राधिकरण, आकुर्डी, रुपीनगर, दापोडी, खडकी, देहूरोड, देहूगाव येथील ग्रामीण डाक सेवक कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. राजू कर्पे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड स्टेशन येथे धरणे आंदोलन सुरू आहे.