पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडून नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटल प्रशासनाचा 'पंचनामा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 01:22 PM2020-10-22T13:22:34+5:302020-10-22T13:23:47+5:30
पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे..
पिंपरी : शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नेहरुनगर येथील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये परिचारिकांना वेतन दिले जात नसल्याने महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. प्रशासनास धारेवर धरत हॉस्पिटलचा पंचनामा केला.‘‘पालकमंत्री व शासनाच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे, अशी टीकाही केली.
पुणे जिल्ह्यातुन कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी व कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडीयम या ठिकाणी राज्य शासन, पीएमआरडीए यांच्या माध्यमातुन जम्बो रुग्णालयाची उभारणी केली. या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णावर उपचार होत आहेत. रुग्णालयासाठी ऑक्सिजन, आवश्यक औषधे, गोळ्या त्याचप्रमाणे सर्व भौतिक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या. मात्र, शासन व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कोविड काळात, जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या या रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांना वेतन दिलेले नाही.
जम्बो रुग्णालयातील ठेकेदार व प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बदनामी होत असल्याने चिडलेल्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी आज रुग्णालयास भेट दिली. येथील कारभाराचा पंचनामा केला. प्रशासनास धारेवर धरले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘परिचारिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोट्यावधीचा खर्च करुन सुध्दा कर्मचाऱ्यांचे वेतन देणे राज्य शासनाला जमलेले नाही. या प्रकारास सर्वस्वी पालकमंत्री व शासन जबाबदार असुन शासन व ठेकेदार यांच्या भोंगळ कारभारामुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघाले आहे. वास्तविक पाहता या रुग्णालयाच्या निविदेचे काम पीएमआरडीए कडुन करण्यात आले असुन ठेकेदाराला निविदा दिलेली आहे. त्यात शासन व पीएमआरडीए चे लक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोण उघड्यावर सोडत आहे. याचे गुपित उघड झालेले नाही.’’