पिंपरी : रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामामुळे भूमिगत वीज वहिनी तुटल्याने सांगवी आणि थेरगाव परिसरातील नागरिकांना विजेचा लपंडाव पहावा लागत आहे. गेल्या वर्षभरात खोदकाम करताना तब्बल ४०५ वेळा वीज वाहिनी तुटल्याच्या घटना या परिसरात घडल्या. त्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचा अनुभव नागरीक घेत आहेत. एप्रिल २०२० पासून महावितरणच्या उच्चदाब ७४ आणि लघुदाबाच्या ३३१ भूमिगत वाहिन्या तोडण्यात आल्या. रस्ता रुंदीकरण, पाणी आणि ड्रेनेज पाईप लाईन टाकण्यासाठी, तसेच खासगी कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई करताना वीज वाहिन्या तुटल्या आहेत. पिंपरी विभागातील सांगवी उपविभागा अंतर्गत वाकड, ताथवडे, जुनी व नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, विशाल नगर, थेरगाव येथील वीज पुरवठा या खोदकामामुळे प्रभावित झाला आहे. महावितरणची उच्चदबाची वीज वहिनी २६ मार्च रोजी तोडण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या राहाटणी येथील १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले. त्यामुळे सांगवी विभागातील १ लाख ९० हजार ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या सर्व सात वाहिन्या बंद पडल्या. अजस्त्र रोहित्र बदलण्यास आठ दिवस लागले. या काळात पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. भार व्यवस्थापन शक्य न झाल्याने चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले. अशा प्रकारामुळे महावितरणला दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागतो. तसेच वीज विक्रीमध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागते. रस्ते खोदाईपूर्वी महावितरणला कल्पना दिल्यास असे प्रकार टाळता येतील असे महावितरणने स्पष्ट केले.-----...तर संगवीतील रुग्णालयांचा वीज पुरवठा होईल खंडित
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पीडब्ल्यू मैदानावर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या परिसरात इतरही अनेक रुग्णालये आहेत. रस्ते खोदाईमुळे रुग्णालयांच्या वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरणला कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम करू नये. खोदकामाची पूर्व कल्पना दिल्यास वीज वाहिन्यांना धोका होणार नाही. खोदाईत वीज वाहिनीचे नुकसान झाल्याप्रकरणी सात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.