लोणावळा : येथील व्यावसायिक व सामजिक कार्यकर्ते प्रकाश माणिक हजारे (वय 41, रा. प्रिच्छली हिल, न्यू तुंगार्ली, लोणावळा) यांना आज बुधवारी दुपारी 1.45 वाजता भरदिवसा घरात घुसून मारहाण करत खंडणी मागणार्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश हजारे यांच्या फिर्यादीवरुन रियाज रफिक सय्यद (रा. रेल्वे पोर्टरचाळ, लोणावळा), रियाज उर्फ लादेन अन्सारी, आमन रियाज अन्सारी, रिहान रियाज अन्सारी (सर्व राहणार कैलासनगर, लोणावळा) व शाहरुख अस्लम खान (रा. गावठाण, लोणावळा) यांच्या विरोधात भादंवी कलम 452, 386, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश हजारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.शनिवार (दि. 13) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अमन रियाज अन्सारी व अन्य एक अनोळखी 20 ते 22 वर्षाचा मुलगा हे कार मधून हजारे यांच्या घरी येऊन अमन अन्सारी याने मला शादान चौधरींकडून पाच लाख रुपये घेऊन दे नाही तर तुम्हाला दोघांना खपवून टाकू असे म्हणत चाॅपरचा धाक दाखवत हजारे यांनी दमदाटी केली होती. यानंतर आज पुन्हा दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास वरील पाचही जण झेन गाडी क्र. (एमएच 04/5152) मधून हजारे यांच्या घरी आले. त्यापैकी रिहान रफिक सय्यद याने हजारे यांच्या घरात घुसत हजारे यांना त्यांचे मित्र प्रफुल्ल रजपुत व महेंद्र कांबळे व कुठुंबिय यांच्या समोर शिविगाळ करत हाताने मारहाण केली तसेच तु शादान चौधरीला आमचा निरोप दिला का नाही असे म्हणत दोन दिवसात आम्हाला पाच लाख रुपये मिळाले पाहिजे तसेच शादान चौधरी यांनी आमच्यावर दाखल केलेली केस काढून नाही घेतली तर दोन दिवसात तुम्हाला दोघांना मारुन टाकतो असे म्हणत दमदाटी केली तसेच हजारे यांच्याकडील दहा हजार रुपये काढून घेत त्यांना शर्टच्या काॅलरला धरत घराच्या गेटपर्यत ओढत आणले त्यावेळी गाडीत बसलेले रियाज उर्फ लादेन अन्सारी गाडीत शिविगाळ करत होता तर आमन अन्सारी चाॅपर दाखवत होता, यावेळी रियान याच्या हातातून निसटत हजारे घरात पळाले. मागील काही दिवसांपासून लादेन बंधू व त्यांचे सहकारी यांनी लोणावळा परिसरात शिवसेनेच्या नगरसेविका शादान चौधरी तसेच अन्य काही व्यावसायीक यांना धमकावत खंडणी वसुलीचा धडाका लावला असल्याने शहरात भितीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यामुळे शहरातील वातावरण दुषित होत असल्याने त्यांना तातडीने अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
लोणावळ्यात व्यावसायिक प्रकाश हजारे यांना घरात घुसून मारहाण व खंडणीची मागणी, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:50 PM