बारामती : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची माळेगाव (ता. बारामती) येथील त्यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी भेट घेतली. गायकवाड काँग्रेसच्या उमेदवारीवर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असणार आहेत. त्यासाठी पवार यांनी हे नाव राहुल गांधींना सुचवले असल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेस पदाधिकाºयांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्यासमवेत झालेल्या भेटीत पुणे लोकसभा उमेदवारीबाबत गायकवाड यांची आज चर्चा झाली. या वृत्ताबाबत संभाजी ब्रिगेडच्या राज्य पदाधिकाºयांनी दुजोरा दिला, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ही भेट राजकीय नसल्याचा दावा केला. मात्र, या भेटीमुळे आज सर्वत्र राजकीय चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
गायकवाड यांच्या भेटीच्या वेळी पवार यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती संभाजीमहाराजफेम अभिनेते डॉ. अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बारामती येथे सध्या डॉ. कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य सुरू आहे. त्यामुळे बारामतीत गेल्या दोन दिवसांपासून मुक्कामी असणाºया डॉ. कोल्हे यांनीदेखील पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुक्तीसमूहाचे प्रमुख प्रफुल्ल तावरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे उपस्थित होते. सोशल मीडियावर या भेटीची छायाचित्रे व्हायरल झाली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. गायकवाड यांचे काँग्रेसच्या उमेदवारीवर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा होती. मात्र, शुक्रवारी (दि. २२) पुणे येथे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या निष्ठावंतांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेसचा पारंपरिक असणाºया पुणे लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार उमेदवार निश्चित करणार का, ऐनवेळी बाहेरून येणाºयांना पक्ष उमेदवारी देणार का, असा सवाल करीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांच्या नावाला काँग्रेस पदाधिकाºयांनी विरोध करीत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पदाधिकाºयांनी गायकवाड यांच्या उमेदवारीला केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ नेते पवार आणि गायकवाड यांच्या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. गायकवाड यांच्या पुणे लोकसभा उमेदवारीला काँग्रेसच्या निष्ठावंतांचा विरोध डावलून ज्येष्ठ नेते पवार यांनी दिलेले ‘बळ’ तारणार का, हे पाहणे औत्सुुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेस पदाधिकारी विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘साहेबां’ची भेटया भेटीबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही भेट राजकीय असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ‘प्रवीणदादा’ यांच्या पुण्याच्या उमेदवारीला काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, पुणे येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस पदाधिकाºयांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ‘साहेबां’ची भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ चर्चा झाल्याचे काटे म्हणाले.
...राजकीय चर्चा झाली नाहीतर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मात्र प्रवीण गायकवाड यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे यांची ही सदिच्छा भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. डॉ. कोल्हे यांनी ‘पवार साहेबां’ना शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा बारामती येथे सुरू असलेला खेळ पाहण्याचे आमंत्रण यावेळी दिले. गायकवाड स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचे सहनिर्माते आहेत. त्यामुळे तेदेखील यावेळी उपस्थित असल्याचा दावा गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.