लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामीण भागात गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने महिलांची कॅन्सरपूर्व मोफत तपासणी आॅगस्टपासून करणार आहे. तसेच महिलांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.देशात आजमितीला १ लाख २२ हजार ८४४ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाला आहे. त्यापैकी ६७ हजार ४७४ जणींचा कॅन्सरने बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या महिलांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. तसेच कॅन्सरच्या तपासणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेकदा ग्रामीण भागातील महिला चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सरपूर्व तपासणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सरपूर्व तपासणी आॅगस्टपासून केली जाणार आहे. ही तपासणी परिचारिकांकडून केली जाणार असून ती मोफत आहे.
महिलांची कॅन्सरपूर्व होणार मोफत तपासणी
By admin | Published: June 10, 2017 1:53 AM