पिंपरी : शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे रुग्णालय प्रशासनाकडून ही प्रतिबंधात्मक लस मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्वाइन फ्लूची गंभीरता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक लस महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. गरोदर महिला, रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना स्वाइन फ्लूची लागण होण्याचा धोका जास्त असतो. हा धोका लक्षात घेऊन महापालिक ा रुग्णालयातर्फे अशा व्यक्तींना प्रतिबंधात्मक लस देण्यात प्राधान्य दिले जाते. तसेच जे डॉक्टर स्वाइन फ्लू असणाऱ्या व्यक्तीवर उपचार करतात किंवा त्यांच्या संपर्कात येतात, अशांना देखीलही लस येते. आतापर्यंत महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधून तीन हजार पाचशे दोन रुग्णांना ही प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यामध्ये वायसीएम -५६२, भोसरी -३९४, सांगवी -२६१, आकुर्डी - ६१६, थेरगाव - ४५७, तालेरा - ४९६, यमुनानगर - २७६, जिजामाता- ४४० या रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र, चार दिवसांपासून वायसीएमसह चिंचवड येथील तालेरा रुग्णालय, भोसरी, आकुर्डी येथील पालिकेच्या रुग्णालयांत या लसीचा तुटवडा जाणवत आहे. (प्रतिनिधी)
प्रतिबंधक लसीचा तुटवडा
By admin | Published: March 25, 2017 3:51 AM