पिंपरी : श्रावणापासून खऱ्या अर्थाने सण-उत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. त्यामुळे बाजारपेठेत कडधान्य व डाळींची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने परराज्यातील कडधान्यांच्या वाहतुकीला अडथळा व भाडेवाढ झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे आवक कमी असून, सणासुदीसाठी ग्राहकांची मागणी वाढल्याने चणा, वाटाणा, मटकी, राजमा या कडधान्यांसह तूर व चणा डाळींच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे पहिल्या दोन टप्प्यात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे ग्राहकांनी कडधान्य व डाळी मिळेल, त्या भावाने खरेदी करून साठा केला. आता कोरोना अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने ग्राहक बाहेर पडत नाही. होलसेल बाजारपेठेपेक्षा जवळच्या किराणा दुकानातून खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे होलसेल बाजारातील कडधान्य व डाळींचे भाव स्थीर असलेतरी किरकोळ विक्रीच्या भावात किलोमागे सरासरी ५ ते १५ रुपयांनी वाढ झाली.
गरिबांना डाळींची फोडणी परवडेना...श्रावणानंतर सणांसाठी डाळींची खरेदी सुरू आहे. शासनाने मोठ्या प्रमाणात चणा डाळीची खरेदी केली. तरीही गेल्या महिन्यांपासून रेशनवर मिळणारी हरभरा व तूरडाळ बंद आहे. त्यामुळे गोरगरीबांना सणासाठी डाळीला फोडणी देणे परवडत नाही. यंदा पाऊस चांगला झाल्याने डाळींचे उत्पादन वाढेल. मात्र, सध्यातरी बाजारपेठेत ग्राहक येत नसल्याने कडधान्यांची आवक कमी आहे. तूर व चणा डाळीची किरकोळ वाढ वगळता होलसेल बाजारात भाव स्थीर आहेत, अशी माहिती व्यापारी अशिष नहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. --------------------------- ‘‘पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील डाळींची आवक लॉकडाऊननंतर ३० ते ४० टक्के कमी झाली. त्यामुळे सध्या बाजारात क्विंटलमागे चणा डाळ ५०० रुपये आणि तूरडाळीचे भाव ४०० रुपयांनी वाढले आहेत.’’- विजय राठोड, होलसेल व्यापारी. ------------------‘‘श्रावणापासून सणासाठी कोणत्याही डाळी घ्यायचे, तर भाव वाढलेले आहेत. यंदा पाऊस चांगला असतानाही माल मिळत नसल्याचे कारण सांगून किराणा दुकानदार जादा भावाने डाळींची विक्री करीत आहेत. ’’- शारदा शिंदे, चिंचवड गाव. -------------बाजारात कडधान्य व डाळींची आवक कमी आहे. सणासाठी ग्राहकांची मागणी वाढल्याने मूगडाळ वगळता इतर डाळी व कडधान्यांच्या भावात साधारण १० ते १२ टक्के वाढ झाली आहे.- सतीश अगरवाल, किरकोळ व्यापारी. ---------------
कडधान्य, डाळींचे होलसेल, किरकोळ भाव
कडधान्य, डाळींचे होलसेल, किरकोळ भाव (प्रति किलो/रुपये) डाळी/कडधान्य लॉकडाऊनपुर्वी किरकोळ तूर डाळ ९० ९५मूग डाळ १०५ ९५चणा डाळ ६० ७०हि. वाटाणा १४० १६०पा. वाटाणा ६८ ८०चणा ५० ६५काबुली चणा ६४ ८५चवळी ७० ८०मटकी ७४ ८५राजमा ७० ८५सोयाबीन ६० ६५