पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा चार वॉर्डांचा मिळून बनलेल्या प्रभागनिहाय पध्दतीनुसार मतदान होणार आहे. एका मतदाराला एका गटासाठी एक याप्रमाणे चार मते द्यायची आहेत. चार गटांमध्ये मतदान करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. एकाच पक्षाला चार, वेगवेगळ्या पक्षातील चार जणांना मतदान करता येऊ शकते. मात्र, चार मते द्यावीच लागणार असून एखाद्या गटातील कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसल्यास त्या गटासाठी ‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) अधिकार वापरणे बंधनकारक आहे. मतदान यंत्रावरील चारही गटात चार मते दिल्यावरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रभागानुसार मतदानाप्रमाणे अनेक प्रकारच्या अफवाही पसरविल्या जात आहेत. एका पक्षाला चार मते दिली तर आपले मत बाद होईल किंवा चारही गटात एकाच पक्षाला मतदान केले तर वैध ठरेल, अशा अफवा आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एका उमेदवाराने आपल्या मताचे चार नगरसेवक महापालिकेत पाठवायचे आहेत. त्याच्या पसंतीप्रमाणे एकाच पक्षाचे चौघे, तिघे, दोघे किंवा एक असेल किंवा अपक्षही असू शकतील. एखाद्या मतदाराला केवळ एकाच किंवा दोन गटातच मतदान करायचे असल्यास उर्वरित गटांसाठी त्याला नोटाचा अधिकार वापरता येणार आहे. महापालिकेच्या ३२ प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या १२८ जागांसाठी ११ लाख ९२ हजार शहरवासीयांना मंगळवारी (दि. २१) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संधी मिळणार आहे. वार्षिक ३.६ हजार कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हा महत्वाचा निर्णय पिंपरीकरांना या मतदानातून घ्यायचा आहे. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
लोकशाहीची शान, करा निर्भयपणे मतदान
By admin | Published: February 21, 2017 3:01 AM