पुणे : पर्यवेक्षक पदोन्नती व वाहतूक भत्ता मिळावा, मुख्याध्यापक पदोन्नती त्वरित द्यावी, ३३ टक्के उर्वरित बोनस त्वरित द्यावा, २०१० पासूनची वरिष्ठ वेतनश्रेणी व २८ वर्षांपासून रखडलेली निवडश्रेणी त्वरित मिळावी, पदवीधर वेतन पदोन्नती शासन आदेशाप्रमाणे मिळावी, या मागण्यांकरिता महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांनी महानगरपालिकेवर शनिवारी मोर्चा काढला. शिक्षण मंडळ कार्यालयापासून निघालेल्या मोर्चामध्ये महिला शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. अंशदायी आरोग्य योजनेची प्रलंबित देयके त्वरित मिळावी, प्रा. फंडाचे अर्ज त्वरित निकाली काढणे, मंजूर निवडश्रेणीची देयके अदा करणे, आर.टी.ई.नुसार शाळा विलीनीकरण करणे, पात्रताधारक बालवाडी सेविकांना शिक्षक नेमणूक म्हणून प्राध्यान्य द्यावे, बी.एल.ओ.ची कामे शिक्षकांना देऊ नये, शिक्षण मंडळातील प्राथमिक शिक्षकांना पुणे मनपा सेवकांप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या शासकीय नियमाप्रमाणे व्हाव्या अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या.या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणेचे अध्यक्ष नितीन राजगुरू, महाराष्ट्र राज्य उर्दू प्राथमिक शिक्षक संघटना पुणेचे अध्यक्ष परवीन शेख, मागासवर्गीय शिक्षक संघटना पुणेचे अध्यक्ष संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना पुणेचे अध्यक्ष मनोहर बाबर, निमंत्रक सचिन वाडकर यांसह सुमारे ३०० शाळांतील २ हजार शिक्षक सहभागी झाले होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांचा महापालिकेवर मोर्चा
By admin | Published: April 19, 2015 12:58 AM