लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणा-या एका खासगी बसनं खंडाळा बोगद्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी बसनं पेट घेतला त्यावेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. नीता कंपनीची ही प्रवासी बस होती. मात्र यावेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला. दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खोपोली नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. काचाबंदिस्त बस आणि बसमध्ये फायबर-फोमपासून बनवलेले इंटेरिअर असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अधिक वेळ लागल्याची माहिती अग्निशमन जवानांनी दिली. मात्र या घटनेमुळे पुण्याकडे येणारी सर्व वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती,यामुळे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती.
कशी लागली बसला आग?मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवासी घेऊन येत असलेल्या ही बस शुक्रवारी (6ऑक्टोबर) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ असलेल्या खंडाळा बोगद्यात पोहोचली. यावेळी बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान दाखवत त्याने तातडीने बस रस्त्याच्या शेजारी उभी केली व काही वेळानंतर बसनं अचानक पेट घेतला. क्षणातच या आगीनं रौद्र रुप धारण केले आणि बस जळून खाक झाली.