पिंपरी : एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या वतीने गुणवत्तापूर्ण शाळांसाठी गौरवल्या जाणाऱ्या बजेट प्रायव्हेट कॅटॅगिरी शाळांमध्ये इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेने पुणे विभागातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि संपूर्ण भारतामध्ये दहाव्या क्रमांकाचे स्थान शाळेला मिळाले आहे.
शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रसिंग यांनी, हे यश शाळेत काम करणाºया प्रत्येक व्यक्तीचे आहे; पालक, बालक आणि शिक्षक यांचा यशामध्ये महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद केले. सहायक अधिकारी नरेंद्र सिंग, मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव आणि अर्पिता मेगेरी यांनी या यशाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रियदर्शनी शाळेची स्थापना १५ आॅगस्ट १९८२ रोजी इंद्रमण सिंग यांनी केली. ‘आय एम ओके अॅज आय एम’ म्हणजेच स्वत:ला आहे तसे स्वीकारून स्वत:तील कौशल्यांचा विकास करणे हे या शाळेचे ब्रीद आहे. स्पोर्टस सिलेक्ट प्रोग्राम हा खास करून मुलांचा शारीरिक विकास आणि तंदुरुस्तीसाठी काम करतो. विकास घडवून आणण्यासाठी हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करून घेतलेल्या फोनेमिक इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, अशी माहिती शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रसिंग यांनी दिली.