चिंचवड : विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे जास्त ओझे विद्यार्थी वाहून नेत आहेत. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला आहे. दप्तराच्या वजनाबाबत वारंवार चर्चा होते. मात्र समस्यांवर तोडगा निघत नसल्याने अथवा शाळा प्रशासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी दप्तराच्या अधिक ओझामुळे त्रस्त झाले असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’ पाहणीत चिंचवडमधील काही इंग्रजी शाळेत आढावा घेतला असता, बहुतांशी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्यामुळे झुकल्याचे दिसून आले. दप्तरात वह्या, पुस्तके, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पाणी बाटली व डब्याचे ओझे घेऊन विद्यार्थी शाळेत येत आहेत. आठवड्यातून एकदा स्केटिंग अथवा कराटे या खेळाचे साहित्यही विद्यार्थी घेऊन येत असल्याचे पालक सांगत आहेत. याबाबत पालक व शाळा प्रशासनास गांभीर्य नसल्याने विद्यार्थी दप्तराच्या ओझामुळे त्रस्त आहेत.चिंचवडमधील काकडे पार्कमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार ते पाच किलो असल्याचे समोर आले. या विद्यार्थ्यांचे वजन बत्तीस किलो ते पस्तीस किलो होते. सरासरी विद्यार्थी दररोज साडेचार ते सहा किलो वजनाचे ओझे पाठीवर घेऊन शाळेत येत आहेत.विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची पाहणी होत नाही.मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर दप्तराच्या वाजनाबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा, असे धोरण आहे. दप्तराच्या ओझ्याबाबत संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्याचे व पाठदुखीचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्याचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती़ परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे पेलवत नाही. त्यामुळे पालकांनाच दप्तर घ्यावे लागत आहे. परंतु वर्गापर्यंत जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
समस्यांवर होतेय फक्त चर्चा, तोडगा मात्र काढलाच जात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 3:25 AM