जमीर सय्यद, नेहरूनगर पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगारात अनेक गैरसोई, समस्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. आगारातील कँटीन गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडले आहे. तर, पोलीस मदत केंद्र बंद आहे. स्वच्छतागृहामध्ये जादा शुल्क वापरून लूट केली जात आहे. येथून दररोज सरासरी ३५०० हजार प्रवासी प्रवास करतात.या आगाराचे उद्घाटन आॅगस्ट १९९८मध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. या एसटी आगारामधून ६६ एसटी बसेस असून, येथून आंध्र प्रेदश, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांसह महाराष्ट्रातील बीड, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमनगर, लातूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये व त्यामधील विविध तालुके, शहरे व विविध खेडेगावांत जातात. तसेच, राज्यातील इतर बस आगारातील २५० एसटी बसेस या स्थानकावर येतात. आगारामध्ये असलेल्या स्वच्छतागृहात प्रवाशांची लूट होत आहे. दोन रुपये शुल्क आणि महिलांसाठी स्वच्छतागृहाचा वापर मोफत आहे. परंतु, येथे प्रवाशांकडून पाच रुपये शुल्क घेण्यात येते. अशा प्रकारे लूट सुरू असूनही व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष केले जाते. या आगारात असलेले ‘पे अँड पार्किंग’मध्ये वाहने लावण्यासाठी जादा शुल्क आकारले जाते. पार्किंगच्या कारणाने नेहमीच प्रवासी आणि ठेकेदाराचे कर्मचारी यांच्यात मोठ्या प्रमाणात भांडणे होतात. वल्लभनगर आगारातील कँटिन सुरू करावे, आगारामधील स्वच्छतागृह व पार्किंग मोफत करण्यात यावे, अशी मागणी एसटीचे महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण यांच्याकडे केली आहे. पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी पाठपुरवा सुरू आहे, असे एसटी प्रवासी संघटनेचे संस्थापक विजय कदम यांनी सांगितले. वल्लभनगर आगारातील कँटिनसाठी टेंडर काढण्यात येते. या गाळ्याचे भाडे आणि महापालिकेच्या विविध करांमुळे व्यावसायिक टेंडर भरत नाहीत. पोलीस मदत केंद्रात मनुष्यबळ कमी असल्यामुळे कधी सुरू, तर कधी बंद असते. स्वच्छतागृहचालक प्रवाशांकडून जादा पैसे घेत असेल, तर त्यांनी तक्रार करावी, असे आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी सांगितले.
समस्यांच्या आगारात प्रवाशांचे हाल
By admin | Published: August 21, 2015 2:36 AM