लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची वाहने जाऊ शकतील, अशी जागा इमारतींच्या जवळ सोडणे बांधकाम नियमावलीत बंधनकारक आहे. असे असताना, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे जाण्यास मात्र अतिक्रमणांमुळे अडथळे निर्माण झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा आगोदरपासून टपऱ्या आहेत़ अलीकडच्या काळात त्यात आणखी भर पडू लागल्याने बुधवारी महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाने अतिक्रमण विरोधी कारवाई करून २४ टपऱ्या आणि ४ हातगाड्या हटविल्या. रुग्णांना तातडीक सेवा मिळावी, यासाठी देशपातळीवर विविध प्रयत्न होत आहेत. अवयव प्रत्यारोपणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंतचा अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा प्रवास विनाअडथळा व्हावा, या करिता ग्रिन कॉरिडोरची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला (वायसीएम) मात्र अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. संत तुकारामनगर परिसरात शैक्षणिक संकुल, रुग्णालय आणि प्रेक्षागृह आहे. त्यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांवर कायम वर्दळ असते. व्यावसायिकदृष्ट्या पूरक वातावरण असल्याने या प्रभागात पावलापावलावर टपऱ्या आहेत. औषध दुकाने, खाणावळ, हॉटेल, टपऱ्या, हातगाड्यांनी परिसर वेढला आहे. दुकानांच्यासमोर रस्त्यावरच दुचाकी,चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. या मार्गावरून पीएमपीच्या बस ये-जा करतात. या बसलासुद्धा रस्त्यात अनेक ठिकाणी अडथळे निर्माण होतात. रुग्णालयाकडे येणाऱ्या मार्गावर अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने रुग्णवाहिकासुद्धा सहजपणे रुग्णालयापर्यंत येणे कठीण झाले असल्याची स्थिती निर्माण झाली होती. ही बाब सजग नागरिकांनी सारथी हेल्पलाइनवर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे महापालिकेला कारवाई करणे भाग पडले. स्वखर्च : टपरीधारकांनीही वापरली क्रेनमहापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने टपऱ्या उचलण्यासाठी क़्रेन आणली होती. तशीच क्रेन टपरीधारकांनी आपल्या टपऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आणली होती. महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी येताच, टपरीधारकांनी स्वखर्चाने आणलेल्या क्रेनच्या माध्यमातून टपऱ्या अलगद उचलल्या जात होत्या. टपरीधारकही टपऱ्यातील माल वाचविण्यासाठी स्वत: क्रेन आणू शकतात. हे दृश्य पहिल्यांदाच संत तुकारामनगरमध्ये पहावयास मिळाले. जुन्या टपऱ्यांना नाही धक्कामहापालिका निवडणूक काळात नव्याने टपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे या वाढीव अतिक्रमणांवर महापालिकेने बुधवारी कारवाई केली. जुन्या टपऱ्यांना धक्का लावला नाही. जुन्या टपऱ्यांना धक्का नाही, नव्याने टाकलेल्या टपऱ्या हटविल्या. यात राजकारण झाले, अशी चर्चा परिसरात होती.
वायसीएममध्ये रुग्णवाहिका नेण्यास अडचणी
By admin | Published: June 01, 2017 2:08 AM