पिंपरी :पुणे येथील प्रख्यात मॅनेजमेंट काॅलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या विवाहित महिलेचा पती, दीर आणि सासू-सासऱ्याने छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहितेकडून वेळोवेळी १४ लाख रुपये घेऊन ते तिला परत दिले नाहीत. हा प्रकार ३ जून २०११ ते ५ मार्च २०२१ या कालावधीत बावधन येथे घडला.
प्रोफेसर असलेल्या ३९ वर्षीय महिलेने याप्रकरणी सोमवारी (दि. १८) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिचा पती, सासू आणि सासरा, दीर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एका प्रख्यात महाविद्यालयात फिर्यादी महिला अधिव्याख्याता आहेत. त्यांचा पती इंजिनियर असून, एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या बॅंक खात्यावरून वेळोवेळी १४ लाख रुपये घेतले. ते पैसे फिर्यादी महिलेला परत दिले नाहीत, असे फिर्यादीत नमूद आहे.