तळेगाव दाभाडे : आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या मोबाइलवर वारंवार येणाऱ्या अश्लील, तसेच जिवे मारण्याच्या धमकीच्या व्हॉट्स अॅप मेसेजला कंटाळून संबंधित प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. ८) दुपारी १२च्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर घडला.तानाजी शाहू सोनवणे (वय २९, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, मूळ रा. तांबेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.या घटनेमुळे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. विद्यार्थिप्रिय अशी त्यांची ओळख होती. सोनवणे हे आंबी (ता. मावळ) येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. ते अविवाहित होते. लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.> दि. २७ डिसेंबर २०१८ पासून वारंवार येत असलेल्या जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील व्हॉट्स अॅप मेसेज संदर्भात प्रा. सोनवणे यांनी येथील पोलीस ठाण्यात २७ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली होती. पण मेसेज येतच राहिल्याने प्राध्यापकाने जीवनयात्राच संपवली.
व्हॉट्स अॅपला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:23 AM