किवळे : रावेतहून मळेकर वस्ती ते किवळे गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्याची चिखलामुळे व खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे़ वाहनचालक व स्थानिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून तसेच खड्ड्यांचा अंदाज न आल्याने आदळून अपघात होत आहेत. गेल्या पंधरवड्यात रस्त्यावरील चिखल व खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत़ या रस्त्यावरील चिखलाचा थर काढून सर्व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्डेमय रस्त्यात वृक्षारोपण करण्यात आले.रावेत येथील कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गापासून मंगल कार्यालये तसेच विविध बांधकाम प्रकल्प सुरू असलेला भाग तसेच किवळे हद्दीतील सांडभोर वस्ती, कातले वस्ती पुढे गणेश मंगल कार्यालय व नगरसेवक तरस वस्तीदरम्यान रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे़ चिखलमय बनलेल्या रस्त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अक्षरश: चिखलाची राबडी तयार झाली असून, पावसाच्या पाण्याने रस्त्यातील मोठे खड्डे वाहनचालकांना समजत नाहीत. परिणामी वाहने आदळत आहेत. चिखलमय रस्त्यावरून वाहने घसरत आहेत. विविध बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने मजूर, वाहने यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात गतिरोधक असून, तेही दिसत नाहीत़ त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी पावसाळी गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे.या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ सर्वाधिक असते. सर्वाधिक रस्ता चिखलाने व्यापला असल्याचे चित्र दिसत असून, गहुंजे, सांगवडे, दारुंब्रे आदी भागांतील शेतकरी सांगवडेतील पवना नदीच्या पुलावरून चिंचवडकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो़ कामगार व विद्यार्थ्यांना चिखलातून जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 3:09 AM