पिंपरी : भाजपाने नगरसेवकांच्या केलेल्या निलंबनाचा निषेध शहरातील विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी केला आहे. माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले, ‘‘सत्ता मिळाल्यानंतर हिटलरशाही हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे. याचा निषेध करण्यात येत आहे. सभागृहात श्रीरंग बारणे, एकनाथ पवार, सीमा सावळे आम्ही अनेकदा जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने केली. एका सभेत सीमा सावळे यांनी कुंड्या फोडल्या होत्या. मात्र, निलंबनाची कारवाई झाली नव्हती. पारदर्शी कारभाराची टीमकी वाजविणाऱ्या भाजपाला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे.’’मानव कांबळे म्हणाले, ‘‘जागरूक नागरिकांचे काम विरोधक सभागृहात करीत असतात. पस्तीस वर्षांत घडले नाही, असे सभागृहात घडले. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आहे. बहुमतात आलो की काहीही करू शकतो.’’माजी महापौर संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘निलंबन कारवाई चुकीची आहे. कुठल्याही नियमास धरून नाही. शास्ती पूर्णपणे रद्दच व्हायला हवी. महापौर शहराचे असतात. एका पक्षाचे नसतात. याचे भान ठेवायला हवे.’’(प्रतिनिधी)
नगरसेवक निलंबनाचा संघटनांकडून निषेध
By admin | Published: April 22, 2017 3:41 AM