पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश ‘स्मार्ट सिटी’मध्ये होणार असल्याची घोषणा केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या निधीअभावी उद्योगनगरीत रखडलेले पवना बंद जलवाहिनी, नदीसुधार प्रकल्प, बीआरटी, घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लागणार आहेत. केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचा एकत्रित समावेश करण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनाचा धोरणानुसार एकाच शहराची निवड शक्य होती. त्यामुळे पिंपरीला वगळून पुण्याचा समावेश पहिल्या यादीत करण्यात आला. या निर्णयामागे राजकारण झाले असून, शहराला सापत्न वागणूक दिली जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांना श्रेय मिळू नये म्हणून शहराला वगळल्याची टीका भाजपावर करण्यात आली होती. दरम्यान, पुण्याचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे महापालिकेचे जलशुद्धीकरण प्रकल्प, मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्प व चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून कोट्यवधीचा निधी मंजूर झाला. मात्र, पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश नसल्याने अनेक प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत.आगामी पुणे व पिंपरी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे भूमिपूजन शनिवारी केले. या कार्यक्रमात व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडकरांची नाराजी दूर करण्यासाठी शहराचा समावेश स्मार्ट सिटीत करण्याची घोषणा केली. त्यामुळे उद्योगनगरीतील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. (प्रतिनिधी)शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यास केंद्र शासनाकडून कोट्यवधीचा निधी मिळेल. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. शहर स्मार्ट आहेच, योजनेत समावेश झाल्याने आणखी स्मार्ट होईल. - शकुंतला धराडे, महापौर
शहरातील रखडलेले प्रकल्प मार्गी
By admin | Published: December 25, 2016 4:48 AM