पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४८ मोबाईल व्हॅन बुधवारपासून राज्यातील २ हजार ५८२ गावांत फिरणार आहेत. पुणे विभागातील ९००; तर पुणे जिल्ह्यातील १९५ गावांचा समावेश आहे. यासाठी ८५ लाखांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. जलसंधारण विभागामार्फत पुढील ५ वर्षांत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या वर्षासाठी सुमारे ६ हजार गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.या गावांपैकी पुणे व औरंगाबाद महसुली विभागातील २ हजार ५८२ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत, तसेच जलयुक्त शिवार अभियानाबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही व्हॅन १ एप्रिलपासून १ मे २०१५ पर्यंत महिनाभर प्रचार करणार आहे. यासाठी पुणे व औरंगाबाद विभागासाठी ४८ व्हॅन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. ५० गावांकरिता १ व्हॅन, असे प्रमाण असणार आहे. (प्रतिनिधी)
मोबाईल व्हॅनद्वारे ‘जलयुक्त शिवार’चा प्रचार
By admin | Published: March 30, 2015 5:28 AM