पिंपरी : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला रंग चढत आहे. मात्र या राजकीय प्रचाराच्या रंगामुळे नोकरदार महिलांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. घरकाम करणाऱ्या ‘मावशी’ कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या प्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी अचानक सुट्टी घेत असल्याने आॅफिस आणि घरकाम सांभाळताना या महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.निगडी, चिंचवड आणि पिंपरी परिसरातील बहुतांश उमेदवारांनी घरोघरी प्रचार, रॅलीवर भर दिला आहे. त्यासाठी त्यांना कार्यकर्त्यांचीच नव्हे शक्तिप्रदर्शनासाठी मोठ्या जनसमुदायाची गरज असते. शिवाय इच्छुकांकडून आपापल्या प्रभागांतील जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. पक्षाकडून तिकिट मिळविण्यासाठी तसेच पक्षश्रेष्ठींवर छाप पाडण्यासाठी आपल्या मागे किती पाठबळ आहे, हे दाखविण्याचा मोह इच्छुकांना आवरत नाही. म्हणून यासाठी रोजंदारीवर कार्यकर्ते आणावे लागत आहेत. यात मोलमजुरी करणाऱ्या तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे. तसेच या महिला कमी रोजंदारीवरही प्रचारकामास येत असल्याने घरकाम करणाऱ्या महिलांना, मदतनिसांना प्रचार रॅलीत सहभागी करून घेण्यावर राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. जेवढा पगार या महिलांना एक महिन्याला मिळतो, तेवढे पैसे एक-दोन रॅलीत मिळत असल्याने, कामावर दांडी मारून प्रचार रॅलीत सहभागी होणे त्यांच्याही फायद्याचे ठरत आहे. (प्रतिनिधी)
‘मावशी’ झाल्या प्रचारात रुजू
By admin | Published: January 11, 2017 3:11 AM