पिंपरी : महापालिका निवडणुकीची आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली. शहराच्या चौकाचौकांतील जाहिरातफलक हटविण्याची कारवाई सुरू झाली. व्हॉटसअॅप, सोशल मीडियावर मात्र इच्छुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. सोशल मीडियावरील प्रचाराला काही बंधन आहे की नाही, याबद्दल धोरण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने राजरोसपणे सोशल मीडियाचा प्रचारासाठी अवलंब केला जात आहे. निवडणूक विभागाकडून आचारसंहिता कधी लागू होऊ शकते याचा अंदाज असताना, महापालिकेच्या निवडणूक विभागाने तसेच अतिक्रमण विभागाने राजकीय पक्षांचे, इच्छुकांचे जाहिरात फलक हटविण्याची कारवाई केली नाही. अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना, राजकीय दबावापोटी महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले. आता आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे जाहिरात फलक हटविण्यासाठी त्यांची अचानक धावपळ सुरू आहे. सोशल मीडियावरील प्रचार महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातील मोबाइलवरही पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)
व्हॉट्सअॅपवर प्रचार सुरूच
By admin | Published: January 12, 2017 2:52 AM