वाकड, दि. 14- चार महिन्यापूर्वी विभक्त झालेल्या पतीने शेती व सदनिका नावावर करीत नसल्याच्या रागातून पत्नी व सासुवर चाकुने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी व सासु गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ज्योतिबानगरच्या काळेवाडी येथील डी मार्ट समोर घडली. याप्रकरणी रवि कमलाकर तुपेकर (वय ५१, रा. तापकिर नगर, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर या हल्ल्यात त्याची पत्नी अनुसया रवि तुपेकर (वय ४५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्यासह त्यांच्या आई सोजरबाई शंकर कोल्हे (वय ६० दोघीही रा. श्रीराम कॉलनी काळेवाडी) या जखमी आहेत.
रवि आणि अनुसया या दोघांचं लग्नाच्या काही वर्षांनंतर पटत नसल्याने ते विभक्त राहतात. सोजरबाई यांनी त्यांच्या मालकीची लातूर येथील पाच एकर शेती व काळेवाडीतील दोन सदनिका अनुसया यांच्या नावे केली आहे. मात्र ही शेती आणि सदनिका आरोपीच्या नावावर करण्याबाबत त्याने नेहमी पत्नी अनुसयाच्या मागे तगादा लावला होता. या कारणासाठीच त्या दोघांमध्ये अनेकदा भांडणं आणि त्यातून मारामारी झाली आहे. बुधवारी सायंकाळी माय-लेकी आळंदी येथून देवदर्शनाहून परतल्या कॉलनीजवळ उतरून भाजीपाला घेत असताना त्यांच्या मागून आलेल्या आरोपीने मी आता तुम्हाला दोघीनांही सोडणार नाही, असं म्हणत चाकूने हल्ला केला. आरोपीने पत्नी आणि तिच्या आईच्या पोटावर, हातावर, तोंडावर वार केले. या हल्ल्यात त्या दोघी गंभीर जखमी झाल्या आहे, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, वाकड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास करीत आहेत.