पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बुद्धीची देवता गणरायाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शहरात वेगळेच चैतन्य संचारले आहे. महिला सबलीकरण, स्त्री-पुरूष समानता हे शब्द कागदावरच न रहाता, प्रत्येक नागरिकांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समान वागणूक देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याची सुरूवात गणेशोत्सवापासून करावी़ यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशाच्या पूजेचा मान ‘ती’ला द्यावा, त्यातून ‘ती’चा सन्मान होईल़ लोकमतच्या ‘ती’चा गणपती या उपक्रमात सहभागी व्हावे, महिलांच्या, मुलींच्या हस्ते आरती करून ‘ती’लाच पूजेचा मान द्यावा, ‘ती’चा गणेशोत्सव साजरा करावा, असे मत पिंपरी-चिंचवड महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘कोणते क्षेत्र आहे, की तिथे महिला आघाडीवर नाही. प्रत्येक क्षेत्रात तीने आपले स्थान कायम केले आहे. महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता हे शब्द कागदावरच न रहाता, प्रत्येक नागरिकांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना समान वागणूक देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याची सुरूवात गणेशोत्सवापासून करावी, यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशाच्या पूजेचा मान ‘ती’ला द्यावा, त्यातून ‘ती’चा सन्मान होईल. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बुद्धीची देवता गणरायाचे आगमन झाले आहे. शहरात वेगळेच चैतन्य संचारले आहे. त्यामुळे शुभकार्याची सुरुवात नागरिकांनी ‘ती’चा सन्मान करून करावी.तसे पाहिले तर आज सर्वत्र राजकीय, शैक्षणिक, कला-क्रीडा-सांस्कृतिक, आरोग्य-वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे सक्षमीकरण होऊन ‘ती’चा विविध माध्यमांतून सन्मान होत आहे. कारण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचा अर्धा वाटा आहे. त्याचा शैक्षणिक माध्यमांतून उपयोग करुन तीने ही सर्व क्षेत्रे केव्हाच पुरुषांच्या बरोबरीने काबीज केली आहेत. किंबहुणा कधी-कधी ती एक पाऊल पुढेही आहे. अर्थात यांमध्ये ‘ती’ला आपल्या कुटुंबाची, कुटुंबातल्या पुरुषांची देखील तेवढीच साथ, सहकार्य मिळाले पाहिजे.’’महापौर म्हणाले, ‘‘तसे पाहिले तर कुटुंबांमध्ये पिढ्यान्- पिढ्या चालत आलेल्या पूजाअर्चा, आरत्या, धार्मिक, पारंपरिक कार्य करण्याची संधी महिलांना अद्याप अनेक कुटुंबांमध्ये मिळाली नाही. त्यामध्ये पुरुष वर्गाचाच मान अथवा मक्तेदारी असल्याचे समाजात दिसून येत आहे आणि तीही त्यासाठी आग्रही नसल्याचेच अथवा मागे असल्याचे दिसून आल्याने तेच चालत आले आहे. तो हक्क ‘ती’ला मिळाला पाहिजे. त्यासाठी कुटुंबाकडून ‘ती’ला पठिंबा मिळाला पाहिजे़ आणि प्रत्येक घराघरांतून ही सुरुवात झाली पाहिजे. लोकमत वृत्तपत्र समूह हे केवळ वृत्तपत्र नसून विचार आणि परिवर्तन घडविणारे दैनिक आहे. एक संस्था आहे. गणेशोत्सवात आर‘ती’चा मान महिलांना फारसा मिळत नाही. यात केवळ बदल नाही तर क्रांती घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल दैनिक लोकमतने गेल्या ५ वर्षांपासून उचलले असून येत्या गणेशोत्सवापासून तीच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन, आरती, पौरोहित्य करण्याची सुरुवात करुन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. हा उपक्रम स्वागतार्ह आणि आनंददायी आहे. त्याबद्दल मी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अभिनंदन करतो.’’ ‘‘राजकीय क्षेत्रांत ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे ती समाजात सर्वाधिक प्रमाणात वावरत असल्याचे दिसत आहे. हे प्रगतिशील आणि पुरोगामी महाराष्ट्रात स्वागतार्ह पाऊल आहे. परिवर्तनाची लोकचळवळ ‘लोकमत’ने सुरू केली आहे.महिला सक्षमीकरणाबरोबरच महिला सुरक्षेची जबाबदारी समाजावर आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात. महापालिकेच्या पातळीवरही अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे स्त्री-पुरूष समानता ही जाणीव अधिक वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरूवात करायला हवी. ‘ती’चा गणपती उत्सवात सहभागी व्हायला हवे. ‘ती’चे सर्वार्थाने सक्षमीकरण करायला हवे. ‘ती’चा गणपती हा उपक्रम ‘ती’चा सन्मान वाढण्यास तसेच समानतेची भावना वाढीस लावण्यासाठी पूरक ठरणार आहे.’’
‘ती’ला सन्मान दिल्यास समानता प्रस्तापित - नितीन काळज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:19 AM