पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रभाग रचनेबरोबर मतदान प्रक्रियेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी २ हजार मतदान केंद्र प्रस्तावित असून, केंद्राच्या पाहणीसाठी पथक नेमले आहे. मतदानासाठी सुमारे दहा हजार मतदान यंत्राची (ईव्हीएम) आवश्यकता आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव ७ सप्टेंबरपर्यंत तयार केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. फेब्रुवारी २०१७मध्ये पालिकेची निवडणूक होणार आहे. प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रभागरचना आणि निवडणुकीच्या तयारीबाबत आयुक्त वाघमारे यांनी माहिती दिली. या वेळी निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने, सहशहर अभियंता राजन पाटील, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. आयुक्त वाघमारे म्हणाले, महापालिका निवडणुकीची प्रभागरचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०११ची १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या गृहीत धरून ३ हजार १०२ प्रगणक गटाच्या साहाय्याने ३२ प्रभागांची रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती नियुक्त केली आहे. लोकसंख्येचा विचार करता अनुसूचित जातीसाठी २० जागा, अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आणि नागरिकांचा मागासांकरिता ३५ जागा राखीव असतील. प्रत्येक प्रभागात महिलांना ५० टक्के आरक्षण राहील. प्रशासनाने महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे दहा हजार मतदान यंत्रांची मागणी केली आहे. तीनही विधानसभा मतदारसंघात १२०० मतदान केंद्र आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सुमारे दोन हजार मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. शहरात २०१२ची मतदार संख्या ११ लाख ५२ हजार ५८८ इतकी होती. तिन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून अंदाजे १ लाख ५० हजार मतदार संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सुमारे साडेतेरा लाख मतदार संख्या अपेक्षित आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र, महापालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालये आणि १४ महाविद्यालये आदी ठिकाणी मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. २ लाख ८ हजार मतदार विविध कारणांस्तव मतदार यादीतून वगळले होते. दुबार नावे, मयत आणि स्थलांतरित मतदारांच्या नावांची यादी विधानसभा मतदारसंघनिहाय संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)
प्रारूप प्रभागरचनेचा सात सप्टेंबरला प्रस्ताव
By admin | Published: September 01, 2016 1:24 AM