पिंपरी : मुलींचे फोटो ऑनलाईन पाठवून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्याव्यवसायातून तीन पीडित महिलांची सुटका केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चिंचवड येथील हाॅटेल कामिनी येथे शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई केली.
जॅक, बबलू, आणि करण यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जॅक हा व्हाटसअपवरून वेगवेगळ्या मुलींचे फोटो गिऱ्हाईकांना पाठवून वेश्यागमनासाठी मुलींची निवड करण्यास सांगत होता. त्यानंतर गिऱ्हाईकांना वेगवेगळ्या हाॅटेलवर बोलवायचा. त्यानंतर हाॅटेलवर आरोपी हे संबंधित पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
आरोपी हे ऑनलाईन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी चिंचवड येथील हाॅटेल कामिनी येथे कारवाई केली. यात दिल्ली येथील दोन व छत्तीसगड राज्यातील एक, अशा एकूण तीन पीडित महिलांची सुटका केली. तसेच चार हजार ६०० रुपयांची रोकड व २० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण चार हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सहायक पोलीस आयुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अमोल साडेकर, जालिंदर गारे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.