मंगेश पांडे, पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सध्या अनधिकृत आणि अतिक्रमण झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ताब्यात येणारे भूखंड शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परताव्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्यामुळे बांधकामे पाडून ताब्यात आलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नयेत, त्या सुरक्षित राहाव्यात यासाठी अशा जागांना भिंत बांधून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे यांनी दिली. प्राधिकरणाची १४ मार्च १९७२ ला स्थापना झाली. यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आल्या. मात्र, प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींवर सीमाभिंत न बांधल्याने त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले. अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे साडेबारा टक्के परताव्यासाठीही प्राधिकरणाकडे जमिनी उरल्या नाही. शेतकऱ्यांना द्यावयाच्या परताव्यासाठी ७५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी प्राधिकरणाकडे विकसित केलेली ५० हेक्टर जमीन असून, आणखी २५ हेक्टर जमिनीची गरज आहे. दरम्यान, थेरगावात शुक्रवारी केलेल्या कारवाईत ताब्यात आलेली जमीन, तसेच इतर क्षेत्र मिळून आणखी दीड हेक्टर जमीन ताब्यात आली आहे.अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटवून ताब्यात आलेल्या जमिनींवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्राधिकरणाकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाच्या बाजूने सीमाभिंत बांधून त्या ठिकाणी प्राधिकरणाकडून फलक बसविण्यात येणार आहेत. यासह जमीन सुरक्षित राहण्यासाठी त्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचे जावळे म्हणाले.
भूखंडांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक
By admin | Published: April 23, 2015 6:32 AM