पिंपरी : वाढदिवसाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारखाने ७२ तासांत बंद करण्याची नोटीस दिली. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने केला आहे. ‘पवारांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली आहे, पिंपरी-चिंचवडमधील नदीचे प्रदूषण करणाऱ्यांवर तत्परता दाखविणार का, असा प्रश्न शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू केले. गणपतीची आरती करून राज्य सरकारला सद्बुद्धी द्यावी, असे साकडे घातले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेविका सुरक्षणा शीलवंत - धर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजन नायर, सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेश बरसागडे, प्रदेश सचिव के.डी. वाघमारे, शहर प्रवक्ता माधव पाटील, वाहतूक संघटनेचे शहराध्यक्ष काशीनाथ जगताप, विद्यार्थी संघटना शहराध्यक्ष राहुल आहेर, संजीवनी पुराणिक, जयंत शिंदे, संदीप पाटील, सुहास देशमुख, रोहित जाधव, राजू चांदणे, अतुल भोसले, योगेश सोनवणे, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
मग पिंपरी-चिंचवडमधील कंपन्यांवर कारवाई करा
तुषार कामठे म्हणाले की, ‘प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांचे प्रदूषण करणाऱ्या किती कारखान्यांवर अशा प्रकारे नोटिसा बजावल्या आणि काय कारवाई केली याचा लेखाजोखा सादर करावा. तसेच राज्यातील किती कारखान्यांवर अशा प्रकारची कारवाई यापूर्वी केली असल्याचे नागरिकांपुढे जाहीर करावे. नोटिसीचे उत्तर आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत नागरिक नक्कीच देतील. राज्य सरकारने केलेले सूडबुद्धीचे राजकारण आहे.’
माजी नगरसेविका सुरक्षा शीलवंत - धर म्हणाल्या, ‘पवार यांनी विविध प्रश्न राज्य सरकारला विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे देणे राज्य सरकारला शक्य नाही. त्यामुळे सूडबुद्धीने त्रास देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने एवढी कार्य तत्परता जर सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दाखवली असती तर बरे झाले असते. या नोटिसांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज दाबता येणार नाही.’
एनसीपी आंदोलन
आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारखाने ७२ तासात बंद करण्याची नोटीस दिली. त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने केला आहे.