पिंपरी : चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. पूल पाडताना गर्दी होऊ नये यासाठी चांदणी चौक परिसरात शनिवारी रात्री अकरापासून ‘कलम १४४’ लागू करण्यात आले असून जमावबंदीचे केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत शनिवारी आदेश दिले.
मुंबई-बंगळूर महामार्गावर चांदणी चौकातील जुना पूल रविवारी (दि. २) रात्री दोनला पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल केला आहे. स्फोटकांचा वापर करून सहा सेकंदात पूल पाडण्यात येणार आहे. स्फोटामुळे पुलाचे दगड व काॅंक्रीट उडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी नागरिकांची तसेच वाहनचालकांची येथे गर्दी होऊन दुर्घटना होऊ शकते. त्यासाठी खबरदारी म्हणून जमावबंदी लागू केली आहे.
दोनशे मीटर परिसर निर्मनुष्य
स्फोट करताना पुलाचा दोनशे मीटर परिसर निर्मनुष्य राहणार आहे. तसेच ५०० मीटर अंतरासाठी जमावबंदी लागू केली आहे. पूल पडताना केवळ पाहण्यासाठी गर्दी होऊ शकते. यात पाऊस किंवा अन्य कारणाने गाेंधळ होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सव्वाचारशेवर पोलिसांचा ताफा
पूल पाडण्यासाठी वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच चांदणी चौकात देखील मोठा फौजफाटा आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाकडून ४२७ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यात तीन पोलीस उपायुक्त, चार सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. तसेच पूल पाडताना चांदणी चौक परिसरात गर्दी करू नये. या परिसरात जमावबंदी लागू केली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड