पिंपरी - आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजानेदेखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. राज्य सरकार मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून, मातंग समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसंबंधी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष व सचिव मधुकर कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे, प्रा. डॉ. राम कांबळे, अॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रा. पंडित सूर्यवंशी, प्रा. डॉ. चागंदेव कांबळे, प्रा. सुभाष वायदंडे, प्रा. सागर रधंवे, स्वप्निल भिंगारदिवे, संदीप ठोंबरे, नितीन दिनकर, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, पूजा देडे, वैशाली थोरात उपस्थित होते. मधुकर कांबळे, अमित गोरखे यांनी मातंग समाजाचे प्रश्न मांडले.क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून नव्या स्वरूपात सुरू करणे याविषयी उपाययोजना आणि त्यांचे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या विविध योजनांची नव्या स्वरूपात पुनर्रचना करणे, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेचे नाव बदलणे, यासह समाज विकासासाठी कृतिशील उपाययोजना करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
मातंग समाज विकासासाठी निधी देऊ - सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 1:50 AM