पिंपरी : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान प्रतिनिधी, दिंडेकरी अशी बैठक झाली. सोहळ्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास केली. दिंडेकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार रीचार्जेबल बॅटरी, ताडपत्री किंवा तंबू अशा वस्तूंपैकी कोणती वस्तू द्यायची यावर निर्णय होणार आहे.जून महिन्यात पालखीसोहळा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज स्थायी समिती सभागृहात संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि देवस्थान प्रतिनिधी, दिंडेकरी अशी बैठक झाली. या वेळी महापौर नितीन काळजे, आयुक्त दिनेश वाघमारे, आळंदी देवस्थानाचे प्रमुख डॉ. अजित कुलकर्णी, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार,अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, संत तुकाराममहाराज पालखी सोहळाप्रमुख सुनील दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, जालिंदरमहाराज मोरे, अभिजीत मोरे, अशोक मोरे, आळंदी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख डॉ. अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार उपस्थित होते. बैठकीमध्ये उपस्थितांनी निगडी येथील भक्ती-शक्ती चौक व आळंदी फाटा, भोसरी येथे भव्य कमानी उभारण्यात याव्यात, आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना असावी, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारीसाठीची योग्य ती व्यवस्था करावी, पालखी मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात, अशाही सूचना प्राप्त झाल्या. मार्गावरील रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिल्या.(प्रतिनिधी)
वारकऱ्यांना सेवासुविधा पुरवा
By admin | Published: April 19, 2017 4:16 AM