पिंपरी : तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत देहू आणि आळंदीत स्वच्छतागृह उभारणीसाठी राज्य आणि केंद्राने मुबलक निधी दिला असताना पालखीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पन्नास लाख देण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. स्वच्छतागृह बांधणीसाठी देहू आणि आळंदीसाठी प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीनिमित्त देहू-आळंदी येथून पंढरपूरला पालखी सोहळा जातो. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज या दोन संतांच्या पालख्या शहरातून पंढरीकडे मार्गस्थ होत असतात. सेवा सुविधा पुरविण्यासंदर्भात नियोजन व्हावे, नागरिकांची गैरसोय टळावी या उद्देशाने सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, देवस्थानांचे प्रतिनिधी अशी बैठक झाली. त्याविषयी महापौर नितीन काळजे यांनी दोन्ही देवस्थानांना स्वच्छतागृह बांधणीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने निधी दिलेला आहे. तरीही महापालिकेकडून निधी देण्याचा घाट कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृहांसाठी पन्नास लाखांची तरतूद
By admin | Published: April 19, 2017 4:20 AM