पिंपरी (पुणे) : झटपट कोट्यधीश होण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिस दलातील उपनिरीक्षकाने सापडलेले मेफेड्रोन (एमडी) विकण्याचा ‘प्लॅन’ केला. मात्र, पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकास शेळके असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याकडून शनिवारी ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. न्यायालयाने शेळकेला दि. ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी शंकर झा (३२, रा. निगडी, मूळ रा. बिहार) याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले होते. उपनिरीक्षक विकास शेळके याने हे ड्रग्ज त्याच्याकडे दिल्याचे चौकशीत समोर आले.
पोलिसांना टीप आणि...निगडी परिसरात २६ फेब्रुवारीच्या रात्री एका गाडीतून मेफेड्रोन असलेले पोते रस्त्यावर पडले होते. मोटारचालक ईश्वर मोटे यांनी ते पोलिस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे दिले. पोत्यातील ४५ कोटींचे मेफेड्रोन पाहून उपनिरीक्षक शेळके याचे डोळे फिरले. ते विकून आपण कोट्यधीश होऊ, असे त्याने स्वप्न रंगवले. एका गुन्हेगाराकडे नमामी झा याला पाठविले. मात्र, त्या गुन्हेगाराने पोलिसांना टीप दिली आणि शेळकेला ताब्यात घेतले.