पिंपरी : नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा यासाठी निवडणूक विभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी वर्गाचाही सहभाग असून, सध्या बहुतेक अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरील डायलर ट्युनद्वारे मतदान करण्याबाबतचे आवाहन केले जात आहे. महापालिकेसाठी २१ फेबु्रवारीला मतदान होत आहे. यासाठी एकीकडे इच्छुकांकडून प्रचाराला वेग आला असता, दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. यासाठी वेगवेगळया माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पथनाट्य, पत्रकवाटप, कलाकारांमार्फत आवाहन, जाहिरात फलक आदींच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत आवाहन केले जात आहे. यामध्ये आता अधिकारीही मागे राहिलेले नाहीत. सध्या महापालिका आणि निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांच्या मोबाइलद्वारे देखील मतदान करण्याबाबत आवाहन केले जात आहे. एखादा अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला फोन लावल्यास मतदान जनजागृतीबाबतची धून कानावर पडत आहे. बहुतेक अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर सध्या या धून वाजत आहेत. (प्रतिनिधी)
डायलर टोनमधूनही जनजागृती
By admin | Published: February 13, 2017 1:58 AM