पुणे : सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडानगरी, आयटी हब म्हणून बिरुदावल्या मिळविणारे पुणे शहर टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शहरात असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठीची बैठक नुकतीच पार पडली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या पुण्यात विविध ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच, शहराचा वेगाने विकास होत असल्याने जगभरातील पर्यटकांचा पुण्याकडे ओढा आहे. त्यामुळे शहरातील पर्यटनास वाव मिळाल्यास आर्थिक विकास आणि स्वयंरोजगार उपलब्ध होणे शक्य असल्याने पर्यटन विकासासाठी शहरात टुरिस्ट हब ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्या अंतर्गत शहरात विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामांच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक पार पडली. त्यानुसार या निधीतून केली जाणारी विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे धनकवडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पुणे होणार आता ‘टुरिस्ट हब’
By admin | Published: November 03, 2014 4:53 AM